महत्वाच्या बातम्या

 विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी नागपूर : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सुचना दिल्या. या बैठकीस  उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिन भुषण गगराणी, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपुर्ण देशभर हा यात्रेचा उपक्रम राबविली जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहिम राज्यात प्रभावीपणे राबवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने कसा राबविता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. यात्रेचा जनजागृती रथ गावांमध्ये जात असतांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांस या उपक्रम कालावधीत विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे सांगितले. उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवितांना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. केंद्र शासनासह राज्याच्या योजनांची देखील या कालावधीत जनजागृती केली जावी, असे त्यांनी सुचविले.





  Print






News - Chandrapur




Related Photos