२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जुनी पेन्शन बाबत समिती गठीत करण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकड्यांवर १  नोव्हेंबर, २००५  पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना  जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत  आदेश पारीत करुन  शालेय शिक्षण विभागाने तीन महिन्यात सदर समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी २६ जून   रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सभापती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी शिक्षण विभाग, वित्त विभाग व विधी व न्याय विभागाचे सचिव यांची एक संयुक्त समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संयुक्त समिती गठीत करण्यात आली असून या समितीत अध्यक्ष म्हणून अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण), सदस्य म्हणून प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग), आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक (विद्यापरिषद) महाराष्ट्र राज्य पुणे तर सदस्य सचिव म्हणून उपसचिव (टीएनटी) शालेय शिक्षण विभाग यांचा समावेश आहे.
या संयुक्त समिती खालील बाबींचा अभ्यास करुन तीन महिन्यांच्या आत शासनास शिफारस करेल. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नियुक्ती दिनांक व टप्पा अनुदान प्राप्त झाल्याचा दिनांक विचारात घेऊन त्यांना निवृत्तीवेतन योजना/अन्य उपाययोजना सूचविणे, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ मधील तरतुदी व  २९ नोव्हेंबर २०१० रोजीच्या शासन निर्णयाच्या संदर्भातील कार्यपद्धती तपासणे, न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाच्या भूमिकेबाबत महाधिवक्त्यांच्या मतानुसार कार्यवाही करणे. आदी अटी समितीला घालून अहवाल सादर करण्याचे आदेश काल २४  जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव व. मि. करंदीकर यांनी दिले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-25


Related Photos