उद्यापासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विकास यात्रा : आ.डाॅ. देवराव होळी


- विकासकामांची माहिती घरा - घरांत पोहचविणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा क्षेत्रात मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला देण्यासाठी, विविध कामांचे भूमिपुजन, लोकार्पण करण्यासाठी तसेच नवीन मतदार व भाजपा सदस्य नोंदणीसाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात वाटचाल विकासाची ही विकास यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आ.डाॅ. देवराव होळी यांनी दिली आहे. 
विकासयात्रा उद्या २५ जुलै रोजी मार्कंडादेव येथून सुरू होणार आहे. सकाळी १० वाजता मार्कंडेश्वराचे दर्शन व जलपुजन केले जाणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ.डाॅ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. यावेळी ‘वाटचाल विकासाची’ या माहितीपुस्तीकेचे विमोचन करण्यात आले.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई भांडेकर, सुधाकर यनगंधलवार, गडचिरोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, लोकनेते नामदेव गडपल्लीवार तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे माहिती देताना आ.डाॅ. होळी म्हणाले, विकासयात्रा संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे.  या यात्रेदरम्यान विकासकार्याची माहिती देणारी संक्षिप्त पुस्तिका  जनतेला देण्यात येणार आहे. मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींची कामे झालेली आहेत. त्या कामांचे लोकार्पण करणे, मंजूर कामांचे भूमिपुजन करणे हा सुध्दा या यात्रेमागील हेतू आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. या यात्रेत जि.प. अध्यक्ष, जि.प. सदस्य, सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरीक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आ.डाॅ. देवराव होळी यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-24


Related Photos