उधारीच्या पैशातून भर बाजारात तरुणाची हत्या, तिघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
उधारीच्या पैशातून निर्माण झालेल्या वादातून  तिघांनी मिळून एका तरुणाची हत्या केली.  सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी बाजारात मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
सुभाष हरिश्चंद्र माहुर्ले (२३) असे मृताचे नाव आहे. तो शिवाजीनगर, कोतवालीत राहत होता. सुभाषचे मामा भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सुभाष मामांसोबत काम करायचा. काही दिवसांपूर्वी सुभाषने आरोपी भट्टी ऊर्फ खुशाल प्रभाकर राजूरकर (२६)  रा. रामबाग  याला उधार रक्कम दिली होती. त्याबदल्यात भट्टीची मोटरसायकल त्याने गहाण ठेवली होती. महिनाभरापूर्वी भट्टीने २० हजार रुपये देऊन आपली मोटरसायकल सुभाषकडून परत नेली. यावेळी १० हजार रुपयांचा हिशेब शिल्लक राहिल्याचे सांगून सुभाष वारंवार भट्टीला पैसे मागत होता. मंगळवारी याच कारणावरून फोनवर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतप्त आरोपी भट्टी तसेच त्याचे साथीदार अभय कमलेश फुसाटे (२०) रा. रामबाग  आणि अतुल घोष रा. इमामवाडा सायंकाळी सुभाषकडे आले. त्यांनी आधी सुभाषला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर चाकूचे सपासप घाव घालून सुभाषला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बाजारात शेकडो महिला-पुरुष होते. त्यामुळे बाजारात प्रचंड दहशत निर्माण झाली. आरोपींनी सुभाषला ठार मारल्यानंतर शिवीगाळ करीत तेथून पळ काढला. या थरारक घटनेची माहिती कळताच सदर पोलीस ठाण्यातील ताफा आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक तेथे पोहचले. आरोपींची नावे कळताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धावपळ करून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या बांधल्या. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना सदर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-07-24


Related Photos