महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम वेगाने पूर्ण करा : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा संकल्प असून, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिले. 

नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना- १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग, धावपट्टीच्या दुरुस्ती आणि  संरक्षण भिंती ही कामे वेगाने पूर्ण करावीत, सूचना देखील यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी येथे आज घेण्यात आली. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. या फ्लाईंग क्लबबाबत नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेण्यात येईल असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.         

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा, एमएडीसी चे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos