चांद्रयान-२ : उड्डाणासाठी सज्ज , दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित होणार


वृत्तसंस्था / श्रीहरीकोटा :  चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट असलेल्या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेअंतर्गत चांद्रयान-२ चे आज  सोमवारी जीएसएलव्ही-एमके ३ - एम १ या शक्तिशाली रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात तांत्रिक अडथळ्यामुळे उड्डाणाच्या केवळ ५६ मिनिटे आधी हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. 
भारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात 'इस्रो'ने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी त्यातील तांत्रिक अडचण तात्काळ दूर केली. यानंतर आज, सोमवारी त्याचे उड्डाण होणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चेन्नईपासून १०० किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित केले जाणार आहे. 
'१५ जुलै रोजी समोर आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. रॉकेट उत्तम स्थितीत आहे. प्रक्षेपणाआधीची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे,' असे 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


चांद्रयानाची वैशिष्ट्ये... 

- भारताची दुसरी चांद्रमोहीम 

- 'इस्रो'च्या इतिहासातील सर्वाधिक गुंतागुंतीची आणि प्रतिष्ठेची मोहीम 

- आजवर कोणत्याही देशाने अभ्यास न केलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणार 

- एकूण खर्च ९७८ कोटी 

- उड्डाणानंतर सुमारे १६ मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार 

- त्यापुढील ४८ दिवसांत १५ महत्त्वपूर्ण चाचण्या करणार 

- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर उतरण्याचा अंदाज 
  Print


News - World | Posted : 2019-07-22


Related Photos