धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम : महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेली हिंदुस्थानची युवा धावपटू हिमा दास हिची घोडदौड सुरूच आहे. झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत शनिवारी हिमाने महिलांच्या ४००  मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. हिमा दास हिचे महिनाभरातील हे पाचवे सुवर्णपदक आहे. हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे ४००  मीटर शर्यत तिने ५२.०९ सेकंदात पूर्ण केली. याआधी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत तिने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३. २५  सेकंदाची वेळेत तिने ही चमकदार कामगिरी केली होती.
हिमाने यापूर्वी २  जुलैला युरोपात, ७ जुलैला कुंटो ॲथलेटिक्स मीटमध्ये, १३  जुलैला झेक गणराज्यात आणि १७  जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पटकावले आहे. झेक रिपब्लिकमधील या स्पर्धेत हिंदुस्थानच्या व्ही. के. विस्मयाने दुसरे स्थान पटकावले. विस्मयाने ४०० मीटरचे अंतर ५२. ४८  सेकंदात पार केले. तर तिसऱ्या स्थानी आलेल्या सरिताबेन गायकवाडने हेच अंतर ५३. २८  सेकंदात पार केले. पुरुषांच्या २०० मीटरच्या स्पर्धेत मोहम्मद अनसने २०. ९५  सेकंदात हे अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले. तर, पुरुषांच्या ४००  मीटरच्या स्पर्धेत हिंदुस्थानच्या नोह निर्मल टॉमने हे अंतर ४६. ०५  सेकंदात पार करत रौप्य पदक मिळवले. तसेच पुरुषांच्या ४००  मीटरच्या अडथळा शर्यतीत हिंदुस्थानच्या एम. पी. जाबीरने हे अंतर ४९. ६६ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. जितीन पॉलने हे अंतर ५१. ४५ सेकंदात पार करत दुसरे स्थान पटकावले.
  Print


News - World | Posted : 2019-07-21


Related Photos