‘खर्रा’ हे विष देऊन आमच्या आईबाबांना हिरावू नका


-  चिमुकल्यांचे आवाहन : पानठेलाधारकांना दिले भावनिक पत्र   
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  आरमोरी :
तालुक्यातील देशपूर येथे शनिवारी सकाळची शाळा सुटताच लहान लहान विद्यार्थी शाळेलगत असलेल्या पानठेल्यावर गेले. खर्रा विक्रेत्यांसह गावातील लोकही यामुळे चक्रावून गेले. या विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेलं पत्र आणि गुलाबाचं फुल विक्रेत्यांना दिलं. ‘आम्हाला आमचे आई वडील प्रिय आहेत. त्यांना खर्रा हे विष देऊन आमच्यापासून हिरावून घेऊन नका’, अशी कळकळीची विनंती चिमुकल्यांनी या विद्यार्थ्यांना केली. विद्यार्थ्यांचा हा पुढाकार पाहून गावकरीही थक्क झाले.

दारू व तंबाखूजन्य पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथ अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे. शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून गावागावांमध्ये, शाळाशाळांमध्ये मुक्तिपथ द्वारे निर्मित यमराजाचा फास हा चित्रपट व्हिडीओ व्हेन द्वारे दाखविला जात आहे. शनिवारी हा चित्रपट तालुक्यातील देशपूर येथील जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. खर्रा सेवन केल्याने कोणते शारीरिक दुष्परिणाम होतात, आतले अवयव कसे खराब होत जातात आणि संपूर्ण कुटूंब कसे बारबाद होते याची कथा रमेश, यमराज आणि चित्रगुप्त या पात्रांतून  सांगण्यात आली.  

हा संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या खर्रा खाण्याच्या सवयीबद्दल सांगितले. यातूनच विद्यार्थ्यांनी पानाठेलाधाराकांना देण्यासाठी एक पत्र तयार केले. खर्रा नावाचे विष आमच्या आई वडिलांना देऊ नका अशी विनंतीचे पत्र या चिमुकल्यांनी शाळेलगतच्या चार पानाठेधाराकांना गुलाबाच्या फुलासाहित दिले. काही लहान मुलेही खर्रा खातात. या मुलांनाही पानठेलाधारक सहज खर्रा देतात. त्यामुळे आम्हालाही विष देऊ नका अशी भावनिक विनंतीही चिमुकल्यांनी केली. जे लोक खर्राविक्री करतात त्यांचीही मुळे या शाळेत आहेत. त्यामुळे या मुलांनीच आपल्या वडिलांना हे पत्र दिले. मुक्तिपथ तालुका चमुदेखील यावेळी उपस्थित होती. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पानठेधाराकांनी खर्राविक्री बंद करावी अशी मागणीही पुढे येत आहे.   

काका आम्हाला वाचवा

‘पानठेला काका, तुमच्या पानठेल्यावर होत असलेली खर्रा व तंबाखूची विक्री बंद करा. असे केल्यास आपण माझ्या आईबाबांना, काकांना व गावाला विष खाऊन होणाऱ्या मरणापासून वाचवू शकता. आम्हाला आमचे आईबाबा खूप प्रिय आहे. त्यांना आमच्यापासून दूर करू नका. काका तुम्ही सुद्धा आम्हाला प्रिय आहात. त्यामुळे सर्वच विषारी पदार्थ विकणे कृपया बंद करा’, अशी आर्त विनवणी विद्यार्थ्यांनी या पत्रातून केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-20


Related Photos