महेंद्रसिंह धोनीची विंडीज दौऱ्यातुन माघार : २ महिन्यांसाठी 'पॅरा मिलिटरी फोर्स' मध्ये जाणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने आपल्या निवृत्ती आणि विंडीज दौऱ्यावर जाण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. ३८ वर्षीय धोनीने सूचित केले आहे कि, तो पुढील दोन महिन्यांत खेळण्यासाठी उपलब्ध नसून तो या दोन महिन्यांत पॅरा मिलिटरी फोर्समध्ये सामील होणार आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे कि, धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही.
भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैकामध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी समिती रिषभ पंत याचा विचार करत असून २०२३ च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने संघाची बांधणी सुरु आहे. महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे या दौऱ्यावर त्याची निवड होते कि नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये काल त्याच्या मॅनेजरने यावर बोलताना सांगितले कि, तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नसून भविष्याचा निर्णय तो घेईल. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु आहेत. मात्र धोनीचे यावर काहीही भाष्य आलेले नसल्याने अनेकांना त्याच्या निवृत्तीचे वेध लागले आहेत.
दरम्यान, बीसीसीआयने देखील अद्यापपर्यंत त्याच्या निवृत्तीवर कोणतेही भाष्य केले नसून अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार धोनी लवकरच यावर निर्णय घेणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-20


Related Photos