बिजेपार येथे पोषण आहाराच्या पाकिटात आढळले मृत वटवाघूळाचे पिल्लू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषण आहाराच्या पाकीटचे वाटप केले जाते. या पोषण आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची संतापजनक घटना गुरुवारी सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे उघडकीस आली. 
 बिजेपार येथील मायरा सचिन वाघमारे या मुलीला आठ दिवसांपूर्वी स्थानिक अंगणवाडीतून मसूरडाळीचे सीलबंद पाकीट देण्यात आले. ते फोडले असता आत वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे आणि सालेकसा पंचायत समितीचे उपसभापती दिलीप वाघमारे यांना दिली. या प्रकारामुळे अंगणवाडीतून वितरीत केल्या जाणाऱ्या पोषण आहारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोषण आहाराच्या माध्यमातून आरोग्य सदृढ होण्याऐवजी उलट आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. अंगणवाडीतून वितरीत करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात कधी मृत पाल, तर कधी अळ्या लागलेला रवा आणि इतर साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. मात्र, यानंतरही पोषण आहाराचे पाकीट तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे बिजेपार येथील घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. 
अंगणवाडी केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकीटात वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले. त्यामुळे अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी बिजेपार येथील गावकऱ्यांनी केली आहे. 'अंगणवाडी केंद्रातून वितरीत करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून संबंधित कंत्राटदारावर निश्चितच कारवाही केली जाईल', अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांनी दिली. 



  Print






News - Gondia | Posted : 2019-07-19






Related Photos