नागरिकांनी तांदळाबाबत गैरसमज करुन घेवू नये : जिल्हा पुरवठा अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
महाराष्ट्र शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई  यांच्या १ जून  २०१८ च्या शासन निर्णयानुसार   सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्टच्या सहाय्याने फोर्टिफाइड तांदुळ वितरीत करण्याबाबतचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याच्या सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार   जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळाचे वाटप सुरू आहे. मात्र नागरिकांमध्ये तांदळाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  यामुळे नागरिकांनी गैरसमज करू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. 
 गडचिरोली जिल्ह्यात ॲनिमिया या रोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असून ॲनिमिया  प्रामुख्याने रोजच्या जेवणात विटामिन A, B९/फॉलेट व B१२ या पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे होत असल्याचे दिसून आले. जर पुरेश्या प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषकद्रव्य दिल्यास ॲनिमिया मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरीत करण्यात येणारा  तांदूळ फोर्टिफाईड करुन जिल्ह्यातील केवळ कुरखेडा व भामरागड तालुक्यांमध्येच वितरीत करण्यात येत असून, साधारण १०० किलो तांदूळात १ किलो पोषणयुक्त तांदूळाचे (Fortified Rice Kernels) दाणे मिसळविण्यात येत असून, सदरहू तांदूळाचे दाण्यांमध्ये (Kernels) मध्ये लोह, फॉलीक ॲसिड, व्हिटॅमिन B१२ व B१ मिश्रीत असल्यामुळे जनतेने सदर तांदूळाबाबत गैरसमज करुन घेवू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटिल यांनी केले आहे. 
तसेच अद्यापपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड तालुक्याव्यतिरीक्त उर्वरित तालुक्यामध्ये फोर्टिफाईड तांदूळाचे अद्यापपर्यंत वाटप सुरू झाले नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-18


Related Photos