गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतलेल्या महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा
: गरोदर मातेने गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी  घेतल्यानंतर महिलेचा अतिरक्तस्रावाने  मृत्यू झाल्याची घटना  धानोरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पवनी  येथे   बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
शांताबाई वासुदेव किरंगे (२६) रा.पवनी असे मृतक महिलेचे नाव आहे. तिला चार वर्ष व दोन वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. गर्भवती असल्याचे तिला कळले, तेव्हा तिसरा महिना सुरू होता. परंतु तिला मूल नको होते. त्यामुळे ती छत्तीसगड राज्यातील मानपूर येथे राहत असलेल्या तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिला गर्भपाताचा सल्ला देण्यात आला. मृतक महिलेच्या मावशीने दिलेले औषध घेऊन महिला मानपूरवरून घरी परतली. गावी आल्यावर औषधी घेतली. दुसऱ्या दिवशी तिला सकाळी रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे ती कुरमाघरात राहायला गेली.
तिच्या मुलीने सकाळी तिला चहा नास्ता नेऊन दिला. त्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास डबा घेऊन पती व मुलगी कुरमाघराकडे गेले. डबा धरून मुलगी कुरमाघरात गेली असता, तिची आई हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. ही बाब मुलीने वडिलाला सांगितली. मृतक महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
मासिक पाळीच्या वेळी आदिवासी महिला कुरमाघरात राहतात. सदर घर गावाच्या एका टोकावर राहते. या कुरमाघरात वीज, पंखा यासारख्या सुविधा नसतात.  बुधवारी सकाळी शांताबाईला रक्तस्राव सुरू झाल्यानंतर ती कुरमाघरात गेली. पण रक्तस्राव वाढत जाऊन तिची तब्येत बिघडली. मात्र ती कुरमाघरात एकटीच होती. त्यामुळे तिच्यावर उपचार होऊ शकले नाही.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-18


Related Photos