तापमानात प्रचंड वाढ , उकाड्याने नागरिक हैराण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाने दडी मारल्याने राज्यभरातच कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथे कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा सहा अंशांपर्यंत वाढ झाली आहे .  यामुळे  नागरिक हैराण झाले आहेत. 
 संपूर्ण राज्यात रविवारपासून तापमानाचा पारा पुन्हा चढायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी ही वाढ अधिक जाणवली. राज्यात नागपूर येथे सर्वाधिक वाढ आढळून आली. नागपूरमध्ये कमाल तापमानात सरासरीपेक्षा ७.४ अंशांनी वाढ होऊन पारा ३८.६ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. वर्धा येथे ६.८ अंश, यवतमाळ येथे ६.३ अंश वाढ बुधवारी नोंदवण्यात आली. मराठवाड्यात परभणी येथे कमाल तापमानात सरासरीहून सहा, तर अहमदनगर येथेही सरासरीपेक्षा सहा अंशांनी वाढ नोंदवली गेली. विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या आर्द्रताही फारशी नाही. त्यामुळे उन्हाळ्यासारखीच स्थिती या भागांमध्ये निर्माण झाली आहे. 
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १८ जुलैला विदर्भ, मध्य महाराष्ट्रात एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवार, १९ जुलैला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यामध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर २० जुलैला यामध्ये मराठवाड्यातील एखाद-दुसऱ्या ठिकाणाचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र मॉडेलची सद्यस्थिती पाहता २१ जुलैशिवाय मराठवाडा, विदर्भ येथे पावसाची शक्यता फार कमी असल्याचे दिसत आहे. कोकणातही २४ जुलैला पावसाची शक्यता असल्याचे या मॉडेलवरून स्पष्ट होत आहे.   
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-18


Related Photos