महत्वाच्या बातम्या

 फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी : आयकर विभागाने पाठवल्या नोटिसा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सोशल मीडियाचा सध्या समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये जोरदार वापर केला जातो. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म संपर्क आणि प्रसिद्धीसाठी जितका उपयुक्त आहे तितकाच याचा वापर जाहिरातींसाठीही केला जातो.

परंतु, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर गेली तीन वर्षांत काही कंपन्यांनी तब्बल १० हजार कोटींची करचोरी केली आहे. आयकर विभागाने ४५ ब्रँडना नोटिसा पाठवल्या आहेत.

यात कोणतीही मोठी ई-कॉमर्स कंपनी नाही. ४५ ऑनलाइन विक्री करणाऱ्या ब्रँड्सना आतापर्यंत नोटिसा पाठवल्या आहेत. मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रमुख किरकोळ विक्रेत्यांचाही यात समावेश आहे. यातील अनेकांनी आपल्या वस्तूंची विक्री विदेशातही केलेली आहे.

कोट्यवधी युजर्स, बक्कळ कमाई : 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरातील कोट्यवधी युजर्स असतात. त्यामुळे यावर उत्पादनांना जोरदार प्रसिद्धी मिळते. विक्रीतून कंपन्यांची बक्कळ कमाईसुद्धा होते. या सर्व ब्रँडनी जोरदार उलाढाल केली आहे. मुंबईतील कपडे विक्रेत्याने ११० कोटींची उलाढाल असताना केवळ २ कोटींची कमाई दाखवून आयकर रिटर्न दाखल केले आहे. या कंपन्या कर भरत नाहीत किंवा कमी प्रमाणात भरतात.

कंपन्यांच्या विक्रीवर विभागाची नजर : 
एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत विभागाकडून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर नजर ठेवली जाते.

विभागाने यातून १० हजार कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. २०२० ते २०२२ या कालखंडातील व्यवहारांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

किती ब्रँड काय विकतात? : 
कपडे : १७
ज्वेलरी : ११
पादत्राणे : ६
फॅशन वस्तू : ५
होम डेकोर, फर्निचर : ४
गिफ्ट : २





  Print






News - Rajy




Related Photos