१९ जुलैला बाल हक्क आयोगाची सुनावणी, विभाग प्रमुखांच्या नियोजन बैठकीत दिल्या विविध सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
१९  जुलै रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची सुनावणी गडचिरोली येथे होणार आहे. या जनसुनावणीच्या अनुषंगाने विविध तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली.
   या बैठकीला जिल्हयातील विभाग प्रमुख व बाल हक्काशी संबंधित सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागपूर विभागातील सहा जिल्हयांमधील बाल हक्क व संरक्षण विषयक तक्रारांची सुनावणी गडचिरोली येथे १९ जुलैला घेतली जाणार आहे. यावेळी गडचिरोली जिल्हयातील विभाग प्रमुखांना निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी लोकांच्यापर्यंत सुनावणीबाबत संदेश द्या अशा सुचना केल्या.
 शालेय प्राचार्य व इतर विभाग प्रमुखांना बाल हक्क सुनावणीबाबत कार्यक्रम आयोजन करण्याच्या सुचनाही यावेळी दिल्या. यामध्ये दवंडी देणे, रॅली घेणे, बैठका आयोजित करुन लोकांच्या पर्यंत तक्रारी दाखल करणेबाबत प्रचार करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी. निकम यांनी दिल्या.
  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी उपस्थित सामाजिक संस्थांच्या सूचनांवर चर्चा केली. या प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध समस्या यावेळी मांडता येतील असे ते म्हणाले.
  प्रचार प्रसिद्धीबाबत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या मार्फत पत्र देणे, पालकांशी संवाद असे उपक्रम राबवावेत अशा सुचना दिल्या. बाल हक्क व संरक्षण आयोगा समोरील तक्रारी येण्यासाठी याबाबत वेळेत माहिती जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
  या आढावा बैठकिला अनुलोम, सामाजिक संस्था, स्पर्श सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासकीय विभागातील विभाग प्रमुखांनी यावेळी नोटीस लावल्याबाबत माहिती दिली. जिल्हयात सर्व सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयात सुनावणीबाबत नोटीस लावण्यात आल्या आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-15


Related Photos