पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने दिली जबर धडक - १ जण ठार, ४ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहे.
महेश भारत भोयर(२३) रा. डॉक्टर कॉलनी वरुड, असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जगदीश जयंतकुमार भस्मे रा. कान्हापूर यांचा एम.एच.४९ एटी. ०३७२ क्रमाांकाचा अ‍ॅपे पंक्चर झाल्याने महिलाश्रमजवळ दुरुस्त करून ते रस्त्याच्या चुकीच्या बाजुने जात होते. याच दरम्यान एम.एच.३२ ऐबी.४४९८ क्रमांकाच्या दुचाकीवर चौघजण सेवाग्रामकडून येत होते. या भरधाव दुचाकीस्वाराने अ‍ॅपेला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत अ‍ॅपेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक जगदिश भसमे हाही जखमी झाला. तसेच दुचाकीवरील महेश भोयर यासह आणखी एकाला गंभीर मार लागला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. महेशसह गंभीर जखमी असलेल्या मित्राला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता महेशचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी अ‍ॅपे चालक जगदिश भसमे यांच्या तक्रारीवरुन अपघाताची नोंद घेतली असून दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या अपघात प्रकरणात एकाचा मृत्यू झाल्याने आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
  Print


News - Wardha | Posted : 2019-07-15


Related Photos