ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सारथी सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करा


- युनाटेड ओबीसी स्टुडंट फेडरेशनची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्रात  युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे हजारो ओबीसी विद्यार्थी असून इतर मागासवर्ग समुहातील विद्यार्थ्यांसाठी  बार्टी व सारथीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्थेची निर्मिती करावी, अशी मागणी दिल्लीत कार्यरत असलेल्या युनायटेड ओबीसी स्टुडंट फेडरेशनने केली आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी  केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नितिन गडकरी, खा. नवनित राणा कौर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर केले आहे.
सारथी सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करयात यावी ही मागणी घेवून विद्यार्थी मंत्रालयात पोहचले. त्यांनी आमदार छगन भुजबळ, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुंटे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांना निवेदन सादर करण्यात आले. 
महाराष्ट्रात  स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणारे अनेक होतकरू तरूण आहेत. त्यातील काही दिल्ली आणि विविध राज्यांमध्ये जाउन अभ्यासाची तयारी करीत आहेत. राज्य सरकारने सारथीमध्ये मराठा आणि कुणबी समाजाचा विचार करून त्यांना समाविष्ट केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याच मोफत मार्गदर्शनाची सोय नसल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर  अन्याय होत असल्याची भावना फेडरेशनचे अध्यक्ष उमेश कोरम यांनी व्यक्त केली. यावर्षी युपीएससी साठी सारथीमार्फत २२५  उमेदवारांची निवड केली गेली असून दिल्लीतील नामांकीत संस्थेतर्फे त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी सुमारे २ लाख रूपये शुल्क सारथी मार्फत भरले जाणार आहेत. मुळातच इतर मागासवर्गीय समाजात परीक्षांबाबत जास्त माहिती नाही. त्यातही जे विद्यार्थी त्यासाठी प्रयत्न करतात त्यांना दिल्लीत जाउन स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  सारथी व बार्टी सारखी संस्था स्थापन करण्याची मागणी फेडरेशनने केली आहे. 
याबाबत ना.संजय कुटे यांनी  विधान सभेत निवदेन केले. राज्यातील ओबीसी, विजेएनटी    आणि एसबीसी  प्रवर्गातील युवकांसाठी,  विद्यार्थ्यांसाठी  एक नवीन स्वायत्त संस्था निर्माण केली जाईल. ज्या पद्धतीने मराठा समाजातील तरुणांसाठी सारथी आणि एसटी  प्रवर्गासाठी बार्टी ह्या स्वायत्त संस्था कार्यरत आहे. त्याच धरतीवर एक  नवीन स्वायत्त संस्था निर्माण केली जाणार.ही संस्था  ओबीसी, विजेएनटी    आणि एसबीसी    प्रवर्गातील तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवणार. गठित केलेली समिती १ महिन्यात अहवाल सादर करणार, अशी माहिती दिली आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-15


Related Photos