चित्रपट 'whatsApp लव' ... प्रेमाची वेगळी अनुभूती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
प्रेमाला उपमा नाही, प्रेम हे कधी, कोणासाठी आणि कोणत्या माध्यमातून प्रकट होईल हे आज ह्या घडीला सांगणे कठीण आहे, आज हे डिजिटल युग आहे, अनेक पर्याय आपल्या समोर आहेत कोण, कधी कोणत्या माध्यमातून आपल्या जीवनात प्रवेश करील हे कोणीच सांगू शकत नाही त्याप्रमाणे त्याचे परिणाम कसे होतात ह्या विषयी तर्क वितर्क करता येत नाही,,,विविध माध्यमातून होणारा प्रवेश कसा होतो ह्या विषयावर " whatsApp लव " हा सिनेमा भाष्य करतो. "
whatsApp लव ह्या नावातच मजा आहे, आणि ह्या नावाच्या " गमती " मधून कोणाचे कसे कोणाबरोबर " जमती " हे whatsApp लव ह्या सिनेमात सादर केल आहे. एच, एम, जी एन्टरटेनमेंट निर्मित आणि जम्पिंग टोमाटो प्रस्तुत ने हा चित्रपट रसिकांच्या साठी सादर केला असून निर्माते / दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी त्याची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा हेमंतकुमार महाले यांनी लिहली असून पटकथा - संवाद अजिता काळे यांचे आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी सुरेश सुवर्णा यांनी सांभाळलेली आहे. यामधील गीते अजिता काळे, साहिल सुल्तानपुरी यांनी लिहिलेली असून त्याला नितीन शंकर यांनी संगीताचा साज चढवला आहे. यामध्ये राकेश बापट, अनुजा साठे, सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष असे कलावंत आहेत.
       हि कथा आदित्य { राकेश बापट } आणि अनु { अनुजा साठे } यांच्या कुटुंबाची असून आदित्य हा एका मोठया कॉर्पोरेट ऑफिस मध्ये मोठया पदावर काम करीत असतो. नुकतेच अनु आणि आदित्य यांचे लग्न झालेले असून आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेल्याचे सेलिब्रेशन ते अत्यंत प्रेमाने करीत असतात, त्या रात्री एक फुलांचा गुच्छ आदित्य साठी कोणीतरी पाठवतो, दुसऱ्या दिवशी अनु ची मैत्रीण त्यांच्या घरी येते, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर ती तिच्याच कॉमन मित्राचे एक लव अफेअर सुरु असल्याची बातमी ती अनु ला सांगते. आपले यजमान कितीही साधे भोळे असले तरी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवत जा असा सल्ला ती जाता जाता देऊन जाते. ह्या बातमीमुळे आणि तिने दिलेल्या सल्ल्यामुळे अनुच्या मनात नको नको ते विचार येतात. त्यातून मग संशयाचे वारे वाहू लागते, आणि त्याच वेळी आदित्यच्या ऑफिस मध्ये ऋचा नावाची मुलगी प्रवेश करते हि मुलगी ऑफिस चे प्रमुख ह्यांची मुलगी असते, ती ऑफिस मध्ये संचालक मंडळावर असते तिला कंपनीच्या मिटिंग मध्ये आपला एक प्रोजेक्ट सादर करण्यास आदित्यने तिला मदत करावी असे ते सांगतात, आदित्य तिला सर्व प्रकारची मदत करून तिला मिटिंग मध्ये प्रोजेक्ट सादर करण्यास तयार करतो, त्याचवेळी आदित्यच्या मोबाईलवर एका मुली कडून एक संदेश येतो, सुरवातीला तो तिकडे लक्ष देत नाही मग एक प्रेमाचा संदेश येतो, पुन्हा पुन्हा येतो, आदित्याची उत्सुकता वाढते.
        आदित्यच्या घरी कधी कधी रात्री सुद्धा ती मुलगी संदेश पाठवते, आणि त्यातून प्रेमाच्या भावना व्यक्त करते, सुरवातीला आदित्य गोंधळात पडतो, बावरतो, कोणीतरी आपली थट्टा करीत आहे असा समज करून घेतो पण संदेश येणे काही थांबत नाही. एक दिवस आदित्य तिला नाव विचारतो त्यावेळी ती आपले नाव " मोनालिसा " असल्याचे सांगते. आणि मग विविध प्रेम भावनाचे खेळ सुरु होतात. आदित्य ज्यावेळी ऋचा ला घेऊन मिटिंग ला जातो त्यावेळी ऋचा त्याला आणखी एक दिवस आपला मुक्काम वाढवूया असे सुचवते, आदित्य तिची मागणी पूर्ण करतो, त्यानंतर ऑफिस मध्ये सुद्धा ह्याची चर्चा सुरु होते, ह्या नंतर असे प्रकार सतत घडत जातात, ह्या सगळ्या घटना आदित्यच्या जीवनात कळत न कळत येतात तो त्या प्रसंगांना कसा सामोरे जातो ? ऋचा आणि आदित्य,,, अनु आणि आदित्य,,, मोनालिसा आणि आदित्य,,, ह्यांचे संबंध कसे असतात ? मोनालिसा त्याला कधी आणि कोणत्या स्वरुपात कुठे भेटते अश्या अनेक भावनिक आणि प्रेमाच्या प्रश्नांची उत्तरे, " whatsApp लव " ह्या सिनेमात मिळतील. 
         दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी आजचा वास्तवातला विषय सुंदरपणे मांडला आहे. आजच्या डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने काय होऊ शकते हे गमतीदार पणे दाखवले आहे. आपल्या बायकोवर आपले प्रेम असतेच पण कधी कधी आयुष्यात धोक्याची वळणे ह्या डिजिटल च्या माध्यमातून येऊ शकतात, कारण whatsaap वर संदेश पाठावणारा आपल्या माहितीचा असतोच असे नसते, आणि प्रेमाचे संदेश येऊ लागले कि पुरुषांच्या भावनांना वेगळीच गती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्यावर गमतीदारपणे सिनेमा भाष्य करतो. 
         राकेश बापट, अनुजा साठे, सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष यांची कामे ठीक झाली असून त्यांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. हेमंतकुमार महाले यांचे दिग्दर्शन छान असून त्यांनी कथेला न्याय दिलेला आहे, परंतु काही ठिकाणी चित्रपटाची गती संथ झालेली जाणवते, काही वेळा तोच तोच पणा आलेला आहे. गीत / संगीत आणि इतर तांत्रिक बाजू ठीक आहेत. “व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे प्रकरण होऊ शकते. खासकरून प्रेमात पडलेल्या, पडू इच्छिणाऱ्या आणि विवाहीत असलेल्या प्रत्येकाने ह्या व्हॉट्सॲप पासून कसे सावध राहायला हवे, जेणेकरून त्यांच्या मधुर संबंधामध्ये मीठाचा खडा पडणार नाही, हे ह्या चित्रपटात अत्यंत गमतीदार पद्धतीने मांडण्यात आले आहे, एकंदरीत सिनेमा ठीक आहे असे म्हणायला हवे. शेवटी प्रेक्षकच काय ते ठरवतील. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-07-15


Related Photos