महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभ


- तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

- महारेशीम अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : रेशीम उद्योगास प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे गावपातळीवर पोहोचविण्यासाठी महा-रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड, क्षेत्र सहायक ज्ञानेश्वर भैरम, शुभम ताकोते, पॅनल तांत्रिक अधिकारी योगेश रोडे, मंगेश हांडे, रविंद्र नागपूरकर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी अविनाश वाट, सचिन वाघमारे, प्रांजल वाघमारे, अविनाश शंभरकर इत्यादी उपस्थित होते.

रेशीम उद्योग हा खरोखरच आर्थिक लाभ मिळवून देणारा उद्योग असून पारंपारीक पिकाला एक उत्कृष्ठ जोडधंदा ठरत आहे. शास्त्रोक्त पध्दतीने रेशीम शेती केली तर मोठ्या प्रमाणावर फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी ही फायद्याची शेती यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या रेशीम शेतीकडे वळण्यासाठी नाव नोंदणी करावी व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभारंभाप्रसंगी केले.

अभियानादरम्यान रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. पात्र शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडी करीता ५०० रुपये नोंदणी शुल्क भरुन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करुन त्या शेतात केलेल्या कामकाजाची मजुरी शासनाकडुन मनरेगाच्या नियमानुसार तीन वर्षाकरीता दिली जाते. या मध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पादीत कोषापासुन होणारे उत्पन्न त्या लाभार्थ्यास दुहेरी लाभ मिळवून देईल. 

लाभार्थ्यांस तीन वर्षा करीता ६८२ मनुष्य दिवस तुती लागवड, जोपासना व किटक संगोपन करणे तसेच २१३ मनुष्य दिवस किटक संगोपनगृह बांधकामाच्या कालावधी मध्ये मजुरी अदा केली जाते. रेशीम पिकासाठी लागणाऱ्या संगोपनगृहासाठी कुशल खर्चाकरीता १ लाख २१ हजार रुपये व साहित्यासाठी ३२ हजार रुपये दिले जाणार आहे. अधिकचा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. जे लाभार्थी मनरेगा योजनेमध्ये बसत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र २ योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, साहित्य, तुती रोप वाटिका, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासुन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीन करीता सर्वसाधारण वर्गासाठी अनुदान देण्यात येते, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos