गर्भवतीचा नाल्याच्या पाण्यातून खाटेवरून प्रवास, माता व बाळ सुखरूप


- भामरागड तालुक्यातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्याच्या दुर्गम भागात नदी , नाल्यांमुळे आजही नागरीकांचे हाल होत आहेत. अनेक गावांपर्यंत रस्ते पोहचलेले नाहीत. नदी, नाल्यांवर पुलांची निर्मिती नाही. एवढेच नाही तर भामरागड येथे जाण्यासाठी पर्लकोटा नदीवरील पुल पार करावे लागते. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हा कमी उंचीचा पुल मार्ग अडवतो. यामुळे तालुक्याचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांचे  काय हाल होत असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. रस्ते आणि पुलाच्या अभावी एका गर्भवतीला खाटेवरून नाला पार करून रूग्णालयापर्यंत पोहचवावे लागल्याची घटना  काल शुक्रवारी घडली आहे. वेळेवर प्रसुती झाल्यामुळे माता आणि बालक सुखरूप आहेत.
तालुक्यातील आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या मिरगुळवंचा येथील बाली आकाश लेकामी (२२) हिला प्रसुती कळा सुरू झाल्या. यामुळे तिच्या कुटूंबीयांनी गावातील वैदूंना पाचारण केले. घरीच प्रसुती करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याची माहिती आशा कार्यकर्त्या प्रज्ञा दुर्वा यांना मिळाली. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात गर्भवतीला रूग्णालयात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. बाली लेकामी हिच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करून तिला रूग्णवाहिकेपर्यंत नाला पार करून पोहचविण्यासाठी तयार केले. यासाठी रूग्णवाहिका चालक पिंटूराज मंडलवार यांनीही मदत केली. नागरीकांच्या सहाय्याने गर्भवतीला खाटेवर टाकून नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आणण्यात आले. यानंतर रूग्णवाहिकेने तिला हेमलकसा येथील रूग्णालयात नेण्यात आले. रूग्णालयात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गर्भवतीने बाळास जन्म दिला. आशा कार्यकर्त्या दुर्वा आणि रूग्णवाहिका चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुखरूप प्रसुती झाली असून माता व बालक दोघेही सुखरूप आहेत. यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातारण आहे. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यात अशा अनेक रूग्णांचे हाल होत असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-13


Related Photos