मुरूमगावच्या महिलांची अहिंसक कृती : पुन्हा पडकली १२ लाखांची दारू


-  ३५ पोते  दारू पोलिसांच्या स्वाधीन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा :
गेल्या आठवड्यात मुरूमगाव येथील महिलांनी रिडवाई च्या जंगलातून पकडलेली दारूची घटना ताजी असतानाच याच महिलांनी गुरुवारी उमरपाल च्या जंगलातून तब्बल १२ लाखांचा दारूसाठा पकडून मुरूमगाव पोलिसांच्या स्वाधीन केला. व्यंकटेश बहिरवारच्या मालकीचा हा दारूसाठा असून जंगलात ही दारू त्याने खड्ड्यांमध्ये पुरून ठेवली होती.
मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावातील दारू बंद करण्याचा निर्धार मुरूमगाव च्या महिलांनी केला आहे. आसपासच्या परिसरातून गावात येणाऱ्या दारूवर महिला बारकाईने लक्ष ठेवून असतात. गेल्याच आठवड्यात महिलांनी रिडवाई परिसरातून मोठा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी व्यंकटेश बहिरवार वर गुन्हाही दाखल आहे. याच परिसरात त्याने आणखी दारू लपवून ठेवल्याची माहिती महिलांना मिळाली. त्यांनी तडक गुरुवारी मुक्तिपथ चमूच्या सहकार्याने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला असता खड्ड्यात तसेच इतरही ठिकाणी लपविलेले देशी दारूचे ३५ पोते महिलांना सापडले.
ही सर्व दारू महिलांनी मुरूमगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. या चुंगड्यामध्ये ७ हजार ६०० बाटल्या आढळून आल्या. हा साठा १२ लाख १६ हजार रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. मुक्तिपथ गाव संघटनेच्या ८ महिला यात सहभागी झाल्या होत्या. या जंगलात इतरही भागात दारू लपवून ठेवून असल्याची शक्यता महिलांनी व्यक्त केली असून पोलिसांनी या परिसरात शोधमोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-12


Related Photos