नवीन वर्षाचा सूर्य दिव्यांगाचे स्वाभिमान वाढविणारा ठरेल : ना. सुधीर मुनगंटीवार


 - दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी  सायकलचे वितरण*
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा :
दिव्यांगांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना १ हजार स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. एकही पात्र दिव्यांग यापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाईल. दिव्यांगा सोबतच विधवा, निराधार, परित्यक्त्या महिलांच्या सामाजिक विकासासाठी त्यांच्या मानधनात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली असून त्यांना नियमित मानधन मिळावे, ३ - ४ महिने त्यांना बँकेत  ताटकळत वाट बघावी लागू नये, यासाठी संबंधित विभागाला  कठोर निर्देश देण्यात आले असून  या प्रकरणांमध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारातून व्याजाची रक्कम कपात करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे  त्यांना नियमित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  दिव्यांगांना सरकार कडून त्यांच्या मालकीचे घर देण्याची तरतूद ही करण्यात येत असून, दिव्यांगांना स्थायी स्वरूपात रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी रोजगारभिमुख उपक्रम उपक्रमांतर्गत  त्यांच्यासाठी ' शॉप ऑन व्हील ' योजना तयार आहे.  विधवा, निराधार आदी महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी लघु उद्योग व सूक्ष्म कर्ज योजना राबविण्याची तयारी आहे .या अभूतपूर्व उपक्रमाने चंद्रपूर जिल्हा इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी  ठरला आहे. त्यामुळे आगामी दिवसात पंतप्रधानांच्या ' मनकी बात ' मध्ये उल्लेख न झाल्यास नवल.  सरकार दिव्यांगाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात  येत असून नवीन योजनांचाही लाभ त्यांना मिळणार असल्याने नवीन वर्षाचा सूर्य दिव्यांगांचा  स्वाभिमान वाढविणारा ठरेल, असे गौरवपूर्ण उद्गगार मा. नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. आनंदवन येथील मुख्यमंत्री सभागृहात जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, चंद्रपूर व नगर परिषद, वरोरा द्वारा आयोजित प्रधानमंत्री खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून अटल स्वावलंबन मिशन योजनेअंतर्गत स्वयंचलित तीन चाकी सायकलचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 
       यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, वरोरा चे नगराध्यक्ष  अहेतेशाम अली, जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे ,कृषी संवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावती पंचायत समिती सभापती विद्या कांबळे, मसेस ,आनंदवनचे विश्वस्त सदाशिवराव ताजने, मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ, बल्लारशा चे नगराध्यक्ष हरिष शर्मा, एसीसीचे  विजय खटी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
       ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की आनंदवन ही सेवेची व त्यागाची भूमी आहे. इथे वंचितांची सेवा करण्याचे काम वर्षोनुवर्षे होत आहे. खरा स्वर्ग पाहायचा असेल तर तो  आनंदवनमध्ये जाणवतो. चांगल्या घटना सेवेतून घडत असतात. आमदार असताना सर्वप्रथम आनंदवनात बनविन्यात येणाऱ्या तीन चाकी सायकल विकत घेऊन ते दिव्यांगांना वितरित केल्या. आता नवीन तंत्रज्ञान आल्याने  स्वयंचलित सायकल दिव्यांगांना वितरित करण्यात येत आहे. चंद्रपूर मध्ये बाबा आमटे अभ्यासिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. ' मिशन शौर्य ' चा खास उल्लेख करीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.  बल्लारपूर येथील एका विद्यार्थ्याने आयआयसी मध्ये देशातून प्रथम येण्याचा मान  मिळून  चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आपल्या जिल्ह्यात गुणवत्तेला कमी नाही फक्त त्याला दिशा व मार्गदर्शन देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. कोणतीही सेवा अथवा उपक्रम राबवित असताना त्याचा लाभ ग्राम,  गाव, जिल्हा पातळीवरील समाजातील छोट्या छोट्या घटकाला मिळायला हवा असा प्रत्येकाचा संकल्प असावा, पशू सुद्धा आपले पोट भरल्यावर नंतर दुसऱ्या अन्ना कडे ढुंकूनही पाहत नाही परंतु मानवाची भूक किती ही खाल्ले तरी शांत होत नाही ती अधिक वाढते.  ही मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
     आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात डॉ.विकास आमटे यांनी नामदार मुनगंटीवार यांच्या  अविरत कार्य  करण्याचा मनोवृत्तीची मुक्तकंठाने  प्रशंशा केली. आनंद मध्ये तीन चाकी सायकलची निर्मिती होते आता बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित तीन चाकी सायकलची सायकल चे तंत्रज्ञान आनंदवनमध्ये विकसित करण्याची गरज  असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी व्यासपीठावर दोन दिव्यांगाना नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते प्रथम प्रातिनिधिक स्वरूपात सायकलचे वाटप करण्यात आले. तदनंतर सभागृह   परिसरात पात्र  १८० दिव्यांगांना एकाच वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वयंचलित तीन चाकी सायकल चे वितरण करण्यात आले
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरानंदनच्या कलाकारांनी आपल्या गीत,  नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मंचावर उपस्थित डॉक्टर विकास आमटे, अहेतेशाम अली, सदाशिवराव ताजने सह जि.प., पं. स.,न.प. सदस्यांचा व मान्यवरांचा  जि.प. सभापती पाझारे यांचे हस्ते शाल,पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
     आपल्या प्रास्ताविक  भाषणात जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे  यांनी दिव्यांग प्रति समाज कल्याण विभागाची  भूमिका विशद केली. जि.प फंडात जमा झालेल्या निधीतून. दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे ते म्हणाले.
       कार्यक्रमांमध्ये आनंदवनचे सरपंच सुधाकर कडू, जी.प.सदस्य सुनंदा जिवतीडे, विद्या किन्नाके, विजय आत्राम, भरत तेला, अमित चवले,  नगर सेवक अक्षय भिवदरे,घोरपडे, काकडे, मेश्राम,साखरीया आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रवींद्र नलगिंटवार यांनी केले. 
     कार्यक्रमात बहुसंख्येने  न.प. कर्मचारी, प.स.सदस्य, आनंदवनातील नागरिक, विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी पत्रकार उपस्थित होते.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-12


Related Photos