दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चांगला पाऊस पडू दे : विठ्ठला चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे


- सपत्नीक केली पूजा 
वृत्तसंस्था / पंढरपूर : 
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे.  असे साकडे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज विठ्ठला चरणी घातले.  परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला.
 शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल मंदिरात दाखल झाले. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी पूजेला सुरुवात झाली, पुढे दीडतास मंत्रोच्चाराने ही पूजा चालली. परंपरेप्रमाणे दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो. हा मान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला.
महापूजेनंतर येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी त्यांचा मंदिर समिती आणि मराठा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजा, महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, हीच प्रार्थना आपण विठ्ठलाचरणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच निर्मल वारी, पर्यावरण वारी, नारीशक्ती असे अनेक उपक्रम राज्य सरकारकडून राबविले गेले. त्यामुळे वारीच्या सकारात्मक शक्तीचा वापर आता हरित महाराष्ट्रासाठी व्हावा ! अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दोन वर्षात चांगले पारदर्शक काम केल्याबद्दल मंदिर समितीचे यावेळी मुख्यमंत्री अभिनंदन केले. ते म्हणाले, पंढरी आणि माऊली सर्वसामान्यांचे आशास्थान आहे. महाराष्ट्रांच्या या शेकडो वर्षांच्या परंपरेने महाराष्ट्रधर्म अबाधित ठेवला. वारीच्या निमित्ताने सकारात्मक शक्तीचा अविष्कार येथे पहायला मिळतो. आक्रमणांच्या काळातही आमची संस्कृती टिकवण्याचे काम वारकऱ्यांनी केले. नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून नदीच्या स्वच्छतेसाठी मोठी गुंतवणूकही करण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-12


Related Photos