काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा


वृत्तसंस्था /  पणजी :  गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करून भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.
काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोनतृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझीन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रीपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरून निर्णय झाला नव्हता.
भाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. भाजपच्या अत्यंत प्रमुख पदाधिकाऱयांची बुधवारी सायंकाळी पणजीत बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व दहा आमदारांनी पक्षापासून फारकत घ्यावी व स्वतंत्र गट स्थापन करून मग भाजपामध्ये विलीन व्हावे अशा प्रकारचा निर्णय झाला. कवळेकर यांनीही त्याचवेळी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली. काँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रीपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना वगळले जाईल, अशीही माहिती भाजपाच्या गोटातून प्राप्त झाली. काँग्रेसपासून फुटून वेगळे झालेले सर्व आमदार दिल्लीस रवाना झाले असून ते पक्षाध्यक्ष व इतर प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-11


Related Photos