मेक - इन - गडचिरोली आणि एचसीएल कंपनीच्या वतीने १३ जुलै रोजी रोजगार मेळावा


- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- १२ वीत ६० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना देणार रोजगार व शिक्षणाची संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मेक - इन - गडचिरोली आणि प्रसिध्द आय टी कंपनी एचसीएल यांच्यामार्फत येत्या १३ जुलै रोजी स्थानिक गोंडवाना कला दालन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, चामोर्शी न.पं. चे गटनेते प्रशांत येग्लोपवार, मेक इन गडचिरोलीचे प्रकल्प समन्वयक श्रीनिवास आदी उपस्थित होते.
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत ६० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना एचसीएल कंपनीच्या वतीने रोजगार दिला जाणार आहे. तसेच पुढील शिक्षणाची जबाबदारीही एचसीएल कंपनी उचलणार आहे. 
१३ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून रोजगार मेळाव्यात नोंदणी केली जाणार आहे. १२ वाजतापासून मेळाव्यास प्रारंभ होईल. यावेळी मेक इन गडचिरोलीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एचसीएल कंपनीचे नागपूर विभागप्रमुख शैलेश आवळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई भांडेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. एन.व्ही. कल्याणकर, नगराध्यक्षा योगिताताई पिपरे आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आ. डाॅ. देवराव होळी यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-10


Related Photos