तीन वाघांच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्याला अटक, १२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चिमूर 
: चिमूर तालुक्‍यातील मेटेपार शेतशिवारात एकाच वेळी तीन वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली . या वाघांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लागला असून एका शेतकऱ्यास अटक करण्यात आली आहे. गावातील कृत्र्यांनी वासराला मारले म्हणून त्यांना मारण्यासाठी वासराच्या पोटात थिमेट टाकले. याच वासराला खाऊन या तिन्ही वाघांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी मेटेपार येथील शेतकरी पांडुरंग तानबा चौधरी (६८) यांना अटक करण्यात आली आहे.
मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळील लक्ष्मण डोमाजी सावसाकडे यांच्या शिवारात तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ त्वरित घटनास्थळी पोहोचले. विषारी प्राणी खाल्याने वाघांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्या दिशेने तपास सुरू झाला. तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, गावातीलच शेतकरी पांडुरंग चौधरी याने वासरात टाकलेल्या विषारी औषधीने तीन वाघ मेल्याचे स्पष्ट झाले. चौधरी यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या कबुलीजबाबानुसार गावातील मोकाट कुत्र्यांनी त्यांचे तीन महिन्याचे वासरू मारले. या कुत्र्यांना मारण्यासाठी ५ जुलैला वासराच्या पोटात तांदळाच्या कणीमध्ये थिमेट मिसळून भरले. हे विषारी वासरू गावाच्या बाहेर नेऊन टाकले. नवतळा खापरी बीटअंतर्गत असलेल्या या नाल्याच्या परिसरातच नेरी, कोटगाव, लावारी या गावालगत वाघांचे वास्तव्य होते. रविवारच्या मध्यरात्री या वाघांना आयतीच शिकार मिळाल्याने ते सावजाकडे यांच्या शेतात आले आणि वासरू खाल्ले. विष टाकलेले वासरू खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. अटकेतील शेतकऱ्याला १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-10


Related Photos