स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे , चालकाला नागरिकांनी दिला चोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. व्हॅनची तोडफोड केली. संतप्त नागरिकांनी त्याचे टक्कल केले व जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिस पोहोचल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास इमामवाड्यातील इंदिरानगर भागात घडली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. आशिष मनोहर वर्मा रा.अजनी चौक,असे  आरोपी चालकाचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दुसऱ्या तर तिचा भाऊ सातव्या वर्गात शिकतो. आशिष याच्या व्हॅनने दोघेही शाळेत ये-जा करतात. नेहमीप्रमाणे दुपारी तो अन्य विद्यार्थ्यांसह दोघांना घरी सोडण्यासाठी जात होता. इंदिरानगर भागात व्हॅनमध्ये विद्यार्थिनी व तिचा भाऊ होता. त्याने विद्यार्थ्याला पैसे देऊन कुरकुरे आणायला पाठविले. तो कुरकुरे आणण्यासाठी जाताच आशिष याने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीने बघितला. तिने आरडा-ओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी आशिषला व्हॅनबाहेर काढून चांगलाच चोप दिला. त्याचे टक्कल केले. व्हॅनची तोडफोड केली. या घटनेने प्रचंड संतापलेले नागरिक आशिषला जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान घटनेची माहिती इमामवाडा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.एम.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.पी.जाधव ताफ्यासह तेथे पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून आशिषची सुटका केली. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारानंतर सुटी होताच उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली.   Print


News - Nagpur | Posted : 2019-07-10


Related Photos