भामरागड येथे स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
स्वच्छ भारत मिशन, पंचायत समिती भामरागड, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१८ - १९ अंतर्गत तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली होती. सदर स्पर्धेचे पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सुकराम मडावी होते. उद्घाटन गटविकास अधिकारी महेश ढोके यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती प्रेमिला कुडयामी, सदस्या गोईबाई कोडापे, विस्तार अधिकारी विनायक देव्हारे, विस्तार अधिकारी प्रभाकर श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१८ - १९ मध्ये जिल्हा परिषद गटामध्ये घेण्यात आली होती. त्यानुसार कोठी - मन्नेराजाराम जिल्हा परिषद गटामध्ये मन्नेराजाराम ग्रामपंचायतीने पुरस्कार पटकाविला. तर आरेवाडा - नेलगुंडा जिल्हा परिषद सर्कलमधून धोडराज ग्रामपंचायतीने पुरस्कार पटकाविला. दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश सरपंच , सचिव यांना शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींमध्ये उत्कृष्ट प्रभागाची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सर्व १९ ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट प्रभागांसाठी १० हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच सरपंच, सचिवांचा शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक मोरेश्वर गव्हारे यांनी केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी विनायक देव्हारे यांनी केले. आभार समुह समन्वयक प्रभाकर दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सचिव, सदस्य उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-09


Related Photos