रोहितने फक्त २७ धावा केल्यास वर्ल्डकपचा इतिहास बदलणार, सचिनचा मोडणार विक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया आज मंगळवारी न्यूझीलंडसोबत सेमी फायनलचा सामना खेळत आहे. या लढतीत सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या विजयासह रोहित शर्माच्या फलंदाजीवर असणार आहे. ‘हिटमॅन’ने फक्त २७ धावा करताच वर्ल्डकपचा इतिहास बदलणार असून रोहित सचिन तेंडुलकरचा १६ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढेल.
यंदाचा विश्वचषक रोहितसाठी खरोखर धावांचा रतीब घेऊन आला. आतापर्यंत रोहितने पाच शतकं झळकावली असून सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. रोहितच्या नावावर ६४७ धावांची नोंद आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध २७ वी धाव घेताच रोहित सचिन तेंडुलकरचा एका वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल. सचिनने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये ११ लढतीत ६७३ धावा चोपल्या होत्या. १६ वर्षापासून सचिनचा हा विक्रम अबाधित आहे. सचिनने १ शतक आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.
सध्या रोहितच्या नावावर ८ लढतीत पाच शतक आणि एका अर्धशतकासह ६४७ धावांची नोंद आहे. सचिनच्या विक्रमासह वर्ल्डकपमध्ये ७०० धावा करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवण्याची रोहितला संधी आहे. याआधी रोहितने संगकाराचा एकाच वर्ल्डकपमधील सर्वाधिक चार शतकांचा विक्रम मोडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने शतक ठोकल्यास एकाच वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक ७ शतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. सध्या हा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने ६ विश्वचषकात सहभाग नोंदवला आणि ६ शतकं ठोकली आहे.

   Print


News - World | Posted : 2019-07-09


Related Photos