१ ऑगस्टला तालुकास्तरावर वीजबिलाची होळी तर ९ ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरावर विदर्भ मार्च


- विदर्भ राज्य आंदोलन समिती विजेच्या प्रश्नावर विचारणार जाब 
- मुख्य संयोजक राम नेवले यांची पत्रकार परिषदेतून माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली 
:  राज्य सरकारने विदर्भ राज्य आंदोलन समितीला वीज प्रश्न व देयकांबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी १ ऑगस्टला सरकारचा निषेध म्हणून विदर्भातील शंभर तालुक्यात विजेच्या देयकाची होळी करण्यात येणार आहे. ९ ऑगस्टला (क्रांतीदिनी) राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावर संविधान चौक ते कोराडी असा वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे , अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे  मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. 
 पत्रकार परिषदेला  महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, गडचिरोली जिल्हा संयोजक अरुण पाटील मुनघाटे, उप्पलवार आदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना नेवले म्हणाले, ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व त्यांनी समितीच्या तीन मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे ३ जून रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. पुढील दोन मागण्यांसाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते. त्याला महिना झाल्याने समितीच्या कार्यकारिणीची बैठक होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. यात विदर्भातील विजेचेदर निम्मे करावे, बिलावरील स्थिर आकार म्हणजे मीटर भाडे न देण्याचा निर्णय, वहन आकार १.२८ रूपये प्रति युनीट वीज शुल्क १६ टक्के इंदन समायोजन कर आदी विदर्भातील जनतेला लुटणाऱ्या रकमेत कपात करण्याची मागणी करण्यात आली. नागपूर शहरातून एसएनडीएलला हद्दपार करावे, झोपडपट्टी, व्यापारी ते कारखानदार यांच्याकडून मोठ्या विजेची बिले देऊन होणारा खिसेकापूपणा रोखावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले. 
दिल्लीमध्ये १०० युनिट विजेला १.२५ रुपये प्रति युनिट दर आहे. गुजरातमध्ये ३.४३ , छत्तीसगडमध्ये ३.७६ , हरियाणामध्ये ३.६५ तर महाराष्ट्रात ५.१० असे दर आहे. तर ५०० युनिटसाठी दिल्ली मध्ये केवळ ३.५० रुपये प्रति युनिट तर महाराष्ट्रात ११.५७ रुपये प्रति युनिट दर आहे. यामुळे महाराष्ट्रात जनतेची लूट केली जात आहे. मुख्य म्हणजे वीजपुरवठा करणाऱ्या विदर्भावरच मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. विदर्भातील जनपतेचे वीज बिल निम्मे करा, शेतकर्यांचे कृषी पंपाचे बिल माफ करा, वीज बिलावर लावलेले अन्यायकारक मिटरभाडे, १.२८  रूपये प्रती युनिट वहन कर, स्थिर आकार व इतर भार व अधिभार संपवून विजेचे दर निम्मे करा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नेवले यांनी दिली.      
विदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या विधानसभेच्या ६२ पैकी ३२ जागा लढविणार आहे. या मतदारासंघाची चाचपणीही करण्यात आली. समिती विदर्भ निर्माण महामंचासोबत निवडणूक लढविणार आहे. त्याची तयारीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-09


Related Photos