आज भारत - न्यूझीलंड मध्ये सेमीफायनल


वृत्तसंस्था / मँचेस्टर :     वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड ही उपांत्य फेरी होणार असून संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.  भारतीय संघ या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अपराजित राहिला आहे. हाच आत्मविश्वास साखळीतील अखेरच्या लढतींमध्ये पराभूत झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 
भारताच्या आघाडीच्या फळीने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल या आघाडीच्या तिघांना पुन्हा एकदा भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून द्यावी लागणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा यशस्वीपणे सामना करावा लागणार आहे. कारण, सध्या न्यूझीलंडचे गोलंदाज चांगले फॉर्मात आहेत. कुठलेही पर्यायी डावपेच नसताना भारताने या वर्ल्डकपमध्ये यश खेचून आणले आहे. यात सातत्य राखण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे. त्यामुळे भारताचे रोहित, लोकेश राहुल, विराट विरुद्ध न्यूझीलंडचे लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, जेमी नीशम, मॅट हेन्री, अशी टक्कर बघायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांना सहज खेळणारा केन विल्यमसन असेल आणि वेगवान गोलंदाजांना थोपवून धरणारा रॉस टेलर असेल. विल्यमसन, टेलरसह नीशम, गप्टील, मन्रो, ग्रँडहोम यांना रोखण्याचे आव्हान भारताच्या जसप्रीत बुमराह, शमी, भुवी, चहल, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. 
या वर्ल्डकपमध्ये भारताने जवळपास सर्व बदल करून बघितले आहेत. तेव्हा उपांत्य फेरीसाठीचा अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना भारताची कसोटी लागणार आहे. लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे. आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान द्यायचे... त्यानंतर रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची...तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की... भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची... याचा खल संघव्यवस्थापनाला करायचा आहे. ढगाळ वातावरण असल्याने तीन गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-07-09


Related Photos