महत्वाच्या बातम्या

 डॉक्टरांचा देसी जुगाड : चुंबकाने काढली ७ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात अडकलेली सुई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी चुंबकाच्या सहाय्याने सात वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात अडकलेली सुई यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. रुग्णालयाने शनिवारी ही माहिती दिली.

माहितीनुसार, बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने एका एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे फुफ्फुसात अडकलेली चार सेंटीमीटर सुई काढली. हेमोप्टायसिस (खोकल्याबरोबर रक्तस्त्राव) झाल्याच्या तक्रारीनंतर मुलाला बुधवारी गंभीर अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले.

बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. विशेष जैन यांनी पीटीआयला सांगितले की, रेडिओलॉजिकल तपासणीत मुलाच्या फुफ्फुसात शिलाई मशीनची लांब सुई अडकल्याचे दिसून आले. डॉ. जैन यांनी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्याच दिवशी संध्याकाळी चांदणी चौक बाजारातून चुंबक खरेदी करण्याची व्यवस्था केली. चार मिलिमीटर रुंद आणि १.५ मिलिमीटर जाड असलेले चुंबक या कामासाठी योग्य साधन होते असे जैन म्हणाले.

प्रक्रियेतील गुंतागुंत स्पष्ट करताना, बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. देवेंद्र कुमार यादव म्हणाले की, सुई फुफ्फुसाच्या आत इतकी खोलवर अडकडलेली होती की पारंपारिक पद्धती जवळजवळ कुचकामी ठरल्या असत्या. ते म्हणाले की, सुई सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने डॉक्टरांच्या टीमने खूप चर्चा केली.

डॉ. जैन म्हणाले, श्वसनलिकेला कोणताही धोका न होता चुंबक सुईच्या ठिकाणी नेणे हा प्राथमिक उद्देश होता. टीमने फक्त एक विशेष उपकरण तयार केले ज्यामध्ये रबर बँड आणि धागा वापरून चुंबक सुरक्षितपणे जोडला गेला. डॉ. यादव यांच्या मते, टीम फुफ्फुसात सुई शोधण्यात सक्षम झाली.

श्वसनलिकेची एन्डोस्कोपी सुरू करण्यात आली आणि टीमला सुईची फक्त टोक सापडली, जी फुफ्फुसात खोलवर अडकली होती. चुंबकाच्या साहाय्याने सुई यशस्वीपणे काढण्यात आल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. एम्सच्या म्हणण्यानुसार, सुई मुलाच्या फुफ्फुसात कशी पोहोचली याबद्दल कुटुंबीय कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.





  Print






News - World




Related Photos