महत्वाच्या बातम्या

 ऑपरेशन ऑल आऊट : ८८ लाखांचे ड्रग्ज पकडले, पाच जणांना अटक, रोख १६ लाखही जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत धडक कारवाई करत एकूण ३५५ ग्रॅम एमडी जप्त करत पाचजणांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान साडेसोळा लाखांची रोकडदेखील जप्त केली आहे.

मुद्देमाल व रोकड अशी एकूण ८८ लाख ४० हजारांची जप्ती या कारवाईदरम्यान झाली आहे. याचसोबत एक नोटा मोजण्याचे मशिन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

या दोन स्वतंत्र कारवायांपैकी पहिली कारवाई आझाद मैदान शाखेने केली आहे. जोगेश्वरी पूर्व येथे एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होती. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे एमडी आढळून आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण २०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले तर त्याचसोबत १५ लाखांची रोख रक्कम, नोटा मोजण्याचे मशिनदेखील ताब्यात घेण्यात आले.

दुसऱ्या कारवाईदरम्यान वांद्रे येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून तो अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या अन्य एका व्यक्तीकडून त्याने अमली पदार्थ घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्या आधारे, दुसऱ्या व्यक्तीलादेखील अटक करण्यात आली. त्या छापेमारीत ५५ ग्रॅम एमडी व दीड लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत अमली पदार्थविरोधी शाखेने एकूण ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos