सीआरपीएफच्या जवानांनी प्राणहिता मुख्यालयात केली तलावाची निर्मिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
स्थानिक प्राणहिता मुख्यालयात कार्यरत सिआरपीएफच्या ११७ व्या बटालियनच्या जवानांनी कमांडंट श्रीराम मिना यांच्या मार्गदर्शनात तलावाची निर्मिती केली आहे. या तलावात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
प्राणहिता पोलिस मुख्यालयात दरवर्षी उन्हाळ्यात प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे जमिनीत पाण्याचा स्तर वाढविण्याची आवश्यकता असल्याची बाब हेरून कमांडंट श्रीराम मिना यांच्या निर्देशानुसार एक तलाव निर्माण करण्यात आला. मुख्यालयाच्या परिसरातून एक नाला वाहतो. याच नाल्यातील पाण्याला अडवून तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावाच्या पाण्यातून परिसरातील झाडांना पाणी देणे शक्य होणार आहे. जमिनीत पाण्याची पातळी वाढून कॅम्प मधील हातपंपाला पाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात येउ शकेल. यामुळे जवानांना तसेच अधिकाऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही. सिआरपीएफच्या वतीने ३७ व्या बटालियनच्या माध्यमातून अहेरी, भामरागड, धोडराज, लाहेरी, कोठी तसेच नारगुंडा येथे १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे कॅम्प परिसरात पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
याआधीसुध्दा एक लहान तलाव कॅम्प परिसरात तयार करण्यात आला होता. या तलावामुळे बोरवेलच्या पाण्यात वाढ झाली होती. काही दिवसांआधी अहेरी उपजिल्हा रूग्णालयात पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. यावेळी सिआरपीएफच्या वतीने टॅंकरद्वारे रूग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. यामुळे आता मोठ्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यामुळे तलाव भरलेले आहे. यामुळे परिसरातील बोरवेलची जलपातळी वाढली आहे. 
३७ व्या बटालियनचे कमांडंट श्रीराम मिना, द्वितीय कमान अधिकारी अमित सागवान, उपकमांडंट संजय कुमार पुनिया, उपकमांडंट राजेंद्र सिंह, वैद्यकीय अधिकारी एम. सम्पथ कुमार व अधिकारी, जवान उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-07


Related Photos