महत्वाच्या बातम्या

 १२ लाखांपैकी केवळ ३४ हजार निरक्षरांची नोंद : शिक्षकांच्या असहकारामुळे नव भारत साक्षरता दुरापास्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : केंद्र सरकारच्या नव भारत साक्षरता कार्यक्रमां तर्गत महाराष्ट्रातील १२ लाख ४० हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ३४ हजार निरक्षरांना शोधून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात यश आले आहे.

या कार्यक्रमाबाबत बहुतांश शिक्षकांकडून असहकाराची भूमिका घेण्यात आल्याने ठरविलेले उद्दिष्ट साध्य करणे शालेय शिक्षण विभागाला दुरापास्त झाले आहे. मुंबईत तर अवघ्या हजार निरक्षरांचीच नोंदणी झाली आहे.

या योजनेच्या कामाला अशैक्षणिक ठरवत बहिष्कार घालून शिक्षक संघटनांनी प्रारंभीच याला विरोध केल्याने योजनेचे काम मंदावले आहे. राज्यात ऑफलाइन सर्वेक्षणाचे व काही प्रमाणात प्रशिक्षणाचेही कामकाज संघटनांनी बंद पाडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर योजना संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी आणि एससीईआरटीचे संचालक अमोल येडगे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे सर्वेक्षण, ऑनलाइन नोंदणी व टॅगिंग, प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन, जिल्हास्तरीय बैठका यांसह योजनेच्या कोणत्याही टप्प्यावरील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कारवाईबाबतचे आदेश २० ऑक्टोबरला काढले. तरीही या योजनेने जोर पकडलेला नाही.

आतापर्यंत दोन वेळा निरक्षरांच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही केंद्राने आखून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यात यश न आल्याने पुन्हा ७ नोव्हेंबरपर्यंत या कार्यक्रमाला मुतदवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या उल्लास ॲपवर ३१ ऑक्टोबरपर्यंत ३३ हजार ९५० निरक्षरांची आणि २ हजार ९६० स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. त्यातही ऑनलाइन टॅगिंग (जोडणी) झालेले निरक्षर आहेत, अनुक्रमे ७ हजार ४५२ आणि १ हजार ६७२.

राज्याचे उद्दिष्ट किती?

राज्याला मागील व चालू वर्षाचे मिळून एकत्रित उद्दिष्ट १२ लाख ४० हजार.
३१ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३३ हजार ९५० निरक्षरांची नोंदणी.
पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक निरक्षर. पण नोंदणीत पुणे मागे
सर्वात कमी निरक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात

साक्षर कसे करणार?

फेब्रुवारी, २०२४ मध्ये निरक्षर व्यक्तींसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मार्फत (एनआयओएस) चाचणी घेतली जाणार आहे. राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी तयार केलेली उजास प्रवेशिका (भाग १ ते ४), उजास स्वयंसेवक मार्गदर्शिका, मूल्यांकन पत्रिका, कृतीपत्रिका, चला जाऊया गोष्टींच्या गावा, असे आनुषंगिक साहित्य दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos