२७ मे रोजी झालेल्या दराची येथील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्याचे अवशेष आढळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२७  मे रोजी सकाळी ९ ते १०  वाजताच्या दरम्यान धनोरा उपविभागातील कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील दराची जंगलात पोलिस दलातील सी - ६०  व विशेष कृती दलाचे जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एक नक्षली ठार झाला होता. त्याचा मृतदेह नक्षल्यांनी तिथेच जाळून टाकला होता. त्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. शामराव उर्फ मुकेश पांडू गोटा रा. पिपलीबुर्गी ता. एटापल्ली असे मृत नक्षल्याचे नाव आहे.
जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली पसार झाले. चकमकीनंतर शोधमोहिम राबविली असता एक १२  बोअर रायफल, ७ नग युबीजीएल, ३ नग वाॅकीटाॅकी, १ नगर सॅमसंग कंपनीचा टॅब, मोबाईल चाॅर्जर, नक्षली पुस्तक  आढळून आले होते. परिस्थितीवरून अनेक नक्षली जखमी झाल्याचे निदर्शनास आले होते.
या चकमकीत ठार झालेला नक्षली शामराव उर्फ मुकेश गोटा याचा मृतदेह  नक्षल्यांनी दराची जंगल परिसरातच जाळल्याची गोपनिय माहिती मिळाली. माहितीवरून पोलिस पथकाने पाहणी केली. यावेळी जळालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले. धानोरा येथील नायब तहसीलदारांच्या समक्ष अवशेष जप्त करण्यात आले. मृत नक्षल्याच्या आई - वडीलांना मृतदेहाची राख नक्षल्यांनी घरी आणून दिल्याचे तसेच मुलाची तेरवी केल्याचेसुध्दा स्पष्ट झाले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-06


Related Photos