महत्वाच्या बातम्या

 मराठवाडा व विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसही रद्द : प्रवाशांचे हाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून मंगळवारी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. यात आंदोलकांनी ठिकठिकाणी बस गाड्यांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून ८०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाडा, विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसही रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

एसटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर आगारातून, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूरकडे जाणाऱ्या बस दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र सकाळी नवले पूल येथे टायर जाळून निषेध नोंदविल्याने स्वारगेटवरून प. महाराष्ट्राकडे सोलापूर, पंढरपूर, सातारा, कोल्हापूर, सांगलीकडे जाणाऱ्या गाड्याही मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आल्या असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

प्रवाशांचे हाल -

सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या अचानक बंद झाल्याने प्रवासांचे हाल झाले. तासन्तास बसची वाट बघत प्रवासांना बसावे लागले. काही प्रवाशांना माघारी जावे लागले तर काही जणांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले. प्रवाशांनी भेटेल त्या गाड्यांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. तर काही प्रवाशांनी बाहेरगावी जाण्याचेे टाळले.

खासगी वाहनांनी लुटले -

मराठवाडा, विदर्भाकडे एसटी गाड्या बंद आहेत तर अचानक दुपारपासून प. महाराष्ट्राकडे जाणाऱ्याही गाड्या रद्द केल्याने नवले पूल, कात्रज येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशी गाड्यांची वाट पाहत थांबले होते. मात्र या मार्गावरील बस बंद असल्याने खाजगी वाहनांनी अव्वाच्या सव्वा दर आकारत प्रवाशांची लूट केली.

पुण्यात कामानिमित्त रविवारी आलो असता, पुन्हा काम संपवून मंगळवारी दुपारी १ वाजता कोल्हापूरकडे जाण्यासाठी कात्रज येथे थांबलो. परंतु गाडी मिळत नव्हती. काही प्रवाशी माघारी गेले तर काहींनी खाजगी गाड्यांची चाैकशी केली. साधारणपणे ते ३०० ते ४०० रुपयांत कोल्हापूरला सोडतात. मात्र काल जवळजवळ दुप्पट ७०० रुपयांच्या दराची मागणी केली जात आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.





  Print






News - Rajy




Related Photos