महत्वाच्या बातम्या

  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आढावा


- प्रलंबित कर्ज प्रस्ताव निकाली काढण्याच्या बँकांना सूचना
- योजनेचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र शासन अर्थसहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अर्थात पीएमएफएमई ही महात्वाकांक्षी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकताच घेतला. 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीला योजना राबवितांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्यात येतात. ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जांना जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन संबंधित बँकेस कर्ज प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात येतात. विविध बँक शाखांमध्ये १६९ कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यास जलदगतीने मंजुरी देण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ज्या बँकांकडे जादा कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशा बँक व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सविस्तर चर्चा केली व प्रकरणे ७ दिवसांच्या आत निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

मागील आर्थिकवर्षी जिल्ह्याला योजनेंतर्गत १३६ प्रकल्प मंजूरीचे लक्षांक प्राप्त होते आणि जिल्हास्तरीय समितीद्वारा १७१ टक्के लक्षांक पूर्ण करण्यात आले, त्याबद्दल आयुक्त कृषि यांनी जिल्हा प्रमुख व योजना राबविणाऱ्या सर्व यंत्रणांची प्रशंसा केली. या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्याला एकूण ३१३ प्रकल्प मंजुरीचे लक्षांक प्राप्त असून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १०२ प्रकल्पांना विविध बँकांद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील पीएमएफएमई योजनेचे नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक परमेश्वर घायतीडक, कृषि पर्यवेक्षक संजय डोंगरे, क्षेत्रीय अधिकारी विवेक भांडेकर, उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos