महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात ५७ हजार नवे मतदार


- प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- मतदार नोंदणीचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. यात जिल्ह्यात ५७ हजार ३४ मतदारांची तर १० मतदार केंद्रांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

१ जूनपासून मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाख १६ हजार ८४३ होती. यात वाढ होऊन मतदारांची संख्या ४१ लाख ७३ हजार ८७७ झाली आहे. ५७ हजार ३४ मतदारांची यात वाढ झाली आहे. तर यापूर्वी जिल्ह्यात ४ हजार ४६४ मतदार केंद्रे होती. यात आता या केंद्रांमध्ये दहाने वाढ होऊन ती ४ हजार ४७४ झाली आहेत.

तृतीयपंथी मतदारांची संख्या २७१ वरून २४६ झाली आहे. तर दिव्यांग मतदारांच्या संख्येत ५१४ ने वाढ होऊन ती १८ हजार ६४ वरून १८ हजार ५७८ झाली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात  मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. इटनकर यांनी यावेळी दिली.

 एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी १ जानेवारी २०२४ पर्यंत निवडणूक आयोगाची परवानगी येऊन डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.

मिशन युवा अंतर्गत आतापर्यंत  सुमारे ३० हजार  युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. ही संख्या ७५ हजारापर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. यासाठी महाविद्यालयांचे, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

शहरातील सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी आपल्या सोसायटीतील मतदार नोंदणी पूर्ण झाली असल्याची खात्री करावी. नागरिक मतदार नोंदणीसाठी वंचित राहू नये याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिका-यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos