महत्वाच्या बातम्या

 कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत विशेष शोध मोहिम
- जिल्हाधिका-यांनी घेतला मोहिम तयारीचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिका-यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज.पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हेमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येळने, डॉ. किशोर भैसारे, डॉ. माखिजा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मोहिमेदरम्यान कारागृह, आश्रम शाळा, निवासी वसतीगृहे व जोखीमग्रस्त भागात विशेष लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थी व नागरिकांची  तपासणी करुन संशयीत रुग्ण आढळून आल्यास तात्काळ औषधोपचाराखाली आणावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे व या दोनही आजाराच्या रुग्णांमध्ये घट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेंतर्गत २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधित आरोग्य पथके गृहभेटी देऊन दोनही आजाराच्या रुग्णांचा शोध घेणार आहे. लक्षणे आढळणा-या रुग्णांवर औषधोपचार केल्या जातील. जिल्हयात २ लाख ७० हजार १४७ घरांना प्रत्यक्ष आरोग्य विभागाचे पथके भेट देतील. पथकांमध्ये २ हजार ५२६ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश राहणार आहे तर २५५ अधिकारी कर्मचा-यांना पर्यवेक्षणासाठी नेमण्यात आले आहे. ही पथके घरोघरी जाऊन दोनही आजाराच्या रुग्णांचा शोध घेतील.

ही मोहिम चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी सबंधित आरोग्य कर्मचारी यांची विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर मोहिमेचा सुक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या संशयित कुष्ठरुग्णांची सात दिवसाच्या आत वैद्यकीय अधिका-यांमार्फत तपासणी केली जातील. संशयित क्षयरुग्णांचे दोन थुंकी नमुने एक तासाच्या अंतरात घेतले जातील. तसेच या रुग्णांच्या सात दिवसाच्या आत छातीचे एक्स-रे घेतले जातील. एक्स-रेत शंका आल्यास त्वरीत सीबीनॅट तपासणी करुन घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहे.    





  Print






News - Wardha




Related Photos