अजयपूर येथे घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
घरगुती वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना जिल्ह्यातील  अजयपूर येथे गुरुवारी सकाळी घडली . या घटनेनंतर पळून जाणाऱ्या मुलाला रामनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपुरातून अटक केली आहे. सुरेश विठोबा नवघडे (४०) असे मृताचे, तर राजकुमार सुरेश नवघडे (२६) असे आरोपीचे नाव आहे.
अजयपूर येथे सुरेश नवघडे हे कुटुंबीयांसह राहत होते. मुलगा राजकुमार हा ट्रकचालक म्हणून काम करतो. गुरुवारी सकाळी या दोघांमध्ये घरासमोरच्या रिकाम्या जागेवरून वाद उफाळून आला. यावेळी रागाच्या भरात राजकुमारने वडीलाच्या छातीवर जोरदार ठोसे लगावले. यात वडील सुरेश नवघडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकुमार हा जुनोनामार्गे बल्लारपूरकडे पळाला.
मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपी बल्लारपूरला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची शोध मोहिम सुरू केली.  त्यावेळी राजकुमारला बल्लारपुरातून अटक करण्यात आली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-04


Related Photos