पबजीचं मिशन पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळाले !


वृत्तसंस्था / भोपाळ :  पबजी ने अनेकांना वेड लावले. यामुळे अनेक घटना समोर येत आहेत.    अनेक तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. या गेमच्या आहारी अल्पवयीन मुलेसुद्धा गेली आहेत.  आता एक वेगळीच घटना समोर आली असून पबजीचं मिशन पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळून गेले आहेत.  विशेष म्हणजे त्यातील एक मुलगी १५ आणि दुसरी मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. तर त्यांचा एक भाऊ ११ वर्षांचा, तर दुसरा अवघ्या ९ वर्षांचा आहे. 
पबजी खेळताना एकच लाइफलाइन उरल्यावर खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी ५०० किलोमीटर अंतर पार करण्याचे टार्गेट दिले गेले होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी ही मुले रविवारी रात्री घरातील सर्व जण झोपले असताना गुणा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेली. तेथून त्यांनी ट्रेन पकडली. मुले घरात नसल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सर्वत्र शोधलं. घरातील १ लाख रुपयेही गायब असल्याचं त्यांना समजलं. सर्वत्र शोध घेऊनही मुलं सापडली नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांमध्ये मुलांबद्दल माहिती दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. गुणा गावापासून अंदाजे २५० किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रवासादरम्यान या मुलांनी दोन हजार रूपये खर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं. 
सोमवारी संध्याकाळी या मुलांना घरी आणून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. पबजी मिशन पूर्ण करण्यासाठी नाही, तर ग्वाल्हेर येथे मॉल बघण्यासाठी गेलो होतो, असं या मुलांनी सांगितलं. पण ही मुलं सधन कुटुंबातील आहेत. त्यांची मॉल बघायची इच्छा घरच्यांनी लगेच पूर्ण केली असती. त्यामुळं ही मुलं मॉल पाहण्यासाठी घरातून पळून गेली असतील यावर विश्वास ठेवणे अवघड  असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.   Print


News - World | Posted : 2019-07-03


Related Photos