महत्वाच्या बातम्या

 कॉपी-पेस्ट प्रबंधावरून संशोधकास दणका : कुलपतींनी केली पीएचडी पदवी रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर : पीएच.डी. च्या संशोधन प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याप्रकरणी किशोर धाबे यांची पीएच.डी. पदवी रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासींसाठीच्या कल्याणकारी ध्येय-धोरणांची अंमलबजावणी या विषयात संशोधन केले. या संशोधनाचा शोधप्रबंध २०१३ मध्ये सादर केला. त्यानुसार त्यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली. या शोध प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोध प्रबंधातील मजकूर चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती नेमली.

या समितीने सदर शोध प्रबंधात ५१ टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. त्यात ६५ टक्के वाड्ःमय चौर्य केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते हा अहवाल स्वीकारून पीएच.डी. रद्द करण्यास संमती दिली. त्यानंतर पदवी रद्द करण्याची शिफारस कुलपती रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली. कुलपतींनी मागील महिन्यात त्यावर सुनावणी घेतली. त्यात विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएच.डी. रद्द करण्यास मंजुरी दिली. त्याविषयीची माहिती राजभवन चे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना पत्राद्वारे दिली.

गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशील -
चार वर्षांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची कठोर अंमलबजावणी केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

संशोधकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी -
संशोधनातील वाड्ःमय चौर्य करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून संशोधकांनी यांची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. अशा घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. संशोधकांनी अत्यंत गांभीर्याने संशोधन कार्य करावे, तसेच नेमकी तथ्य व निष्कर्ष मांडावेत. - डॉ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू





  Print






News - Rajy




Related Photos