वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ होणार


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. 
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना वनमंत्री म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी दोन लाख रुपयांची मदत दिली जात होती. ती पाच लाख करण्यात आली. २०१४ मध्ये ती रक्कम १५ लाख एवढी करण्यात आली. यापैकी तीन लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात. भविष्यकाळात त्या कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, १२ लाख रुपये अनामत म्हणून बँकेत ठेवले जातात. यामदतीच्या रकमेत वाढ करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
वन्यप्राण्यांद्वारे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान केले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता समिती नेमण्यात आली असून शेतकऱ्यांना १५ दिवसात भरपाई मिळावी यासाठी या समितीच्या माध्यमातून कायदा करण्यात येत असल्याचे  मुनगंटीवार यांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-02


Related Photos