महत्वाच्या बातम्या

 आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना मिळणार दहापट रक्कम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडूं आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री बनसोडे म्हणाले, १९ व्या चीन येथील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रूपये, मार्गदर्शकास १० लक्ष, रौप्यपदका विजत्या खेळाडूसाठी ७५ लक्ष रूपये, मार्गदर्शकास ७ लक्ष ५० हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूस ५० लक्ष रुपये, मार्गदर्शकास ५ लक्ष रुपये रोख असे बक्षिस देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लक्ष, मार्गदर्शकास ७ लक्ष ५० हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लक्ष, मार्गदर्शकास ५ लक्ष तर कास्य पदक विजेत्यास २५ लक्ष, मार्गदर्शकास २ लक्ष ५० हजार देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

यापुर्वी सुवर्णपदकासाठी १० लाख मार्गदर्शकास २ लक्ष ५० हजार, रौप्यपदकासाठी ७.५ लाख,मार्गदर्शकास १ लक्ष ८७ हजार, कांस्यपदकासाठी ५ लाख, मार्गदर्शक १लक्ष २५ हजार रुपये दिले जात होते. मात्र आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिक स्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात महाराष्ट्राच्या खेळडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसापुर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाची आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा करण्यात आली होती, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos