विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार शिकाऊ परवाने


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
महाविद्यालयीन  विद्यार्थी व विद्यार्थिनींना   महाविद्यालयातच शिकाऊ परवाने (लर्निंग लायसन्स) देण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे.   राज्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी  विधानसभेत केले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
मोटार वाहन नियमानुसार वाहन चालवणाऱ्याकडे वाहन चालवण्यासाठी लायसन्स (अनुज्ञप्ती) असणे आवश्यक आहे. पण वाहन चालवण्याचा परवाना काढण्यापूर्वी वाहनधारकाला संगणकीय चाचणीद्वारे लर्निंग लायसन्स घेणे आवश्यक आहे. पण लर्निंग लायसन्स काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिवहन कार्यालयात येऊन संगणकीय चाचणीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी लर्निंग लायसन्स महाविद्यालयातच देण्याचा निर्णय परिवहन विभागाने २०१७ मध्ये घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संगणकीय चाचणी घेऊन लर्निंग लायसन्स दिले जाते.
मुंबईसह कल्याण, नाशिक, नागपूर, चंद्रपूरमधील महाविद्यालयांत ४९ शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांत १ हजार ७८२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार ३१७ अर्जदार संगणकीय चाचणीत उत्तीर्ण झाले त्यांना लर्निंग लायसन्स देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील  सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन दिवाकर रावते यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-02


Related Photos