महत्वाच्या बातम्या

 आर्वी येथे वखार आपल्या दारी अभियान कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आर्वी येथे वखार महामंडळाच्या गोदामात वखार आपल्या दारी या अभियानाची चौथी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस सुमारे ८० हून अधिक शेतकरी, शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांच्या फेडरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यीत स्मार्ट प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने वखार आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले होते. याप्रसंगी वखार महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभागीय प्रमुख सुभाष पुजारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर, एमसीडीसीचे अमरावती विभागाचे विभागीय व्यवस्थापक दिपक बेदरकर, उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक व महिला बचतगट या कार्यक्रमास उपस्थित होते.

आर्वी येथील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गोदाम पावती योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन वखार महामंडळाचे नागपूर विभागीय प्रमुख सुभाष पुजारी यांनी केले. पोकरा प्रकल्पाचे समन्वयक प्रशांत साठे, स्मार्ट प्रकल्पाचे आर्थिक सल्लागार गुप्ता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे आर्वी तालुका व्यवस्थापक किशोर हादले, सहकारी अधिकारी ए.डी. चर्जन, लोक जन संचालित साधन केंद्राचे उपजीविका सल्लागार विवेक भबुतकर, वखार महामंडळ आर्वीचे वखार केंद्र प्रमुख मेश्राम आदी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र वखार महामंडळामार्फत गोदाम पावती योजनेंतर्गत शेतकरी वर्गास गोदाम भाड्यात ५० टक्के सूट व शेतकरी कंपनीस २५ टक्के सूट देण्यात येते. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत ९ टक्के दराने शेतमालाच्या चालू बाजारभावाच्या ७० टक्के कर्ज देण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन चालू हंगामात शेतमाल लगेच न विकता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठवावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प उपसंचालक रमेश देशमुख यांनी यावेळी केले.





  Print






News - Wardha




Related Photos