ज्येष्ठ काँग्रेसनेते सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही आणि नवा अध्यक्ष पक्षानेच निवडावा, असे पुन्हा स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ काँग्रेसनेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.   
 प्राप्त माहितीनुसार  गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या नावाला जाहीर करण्यासाठी अद्याप काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत जवळपास १४० नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे राजीनामा नाट्य संपल्यानंतरच ही घोषणा होईल, अशी माहिती आहे. 
नवा पक्षाध्यक्ष ठरवण्यात राहुल गांधी स्वत: सहभागी होणार नसले तरी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. आपण नव्या अध्यक्षाबाबत कोणाशी चर्चाही करणार नाही, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले आहे. नवा पक्षाध्यक्ष कोणीही असला तरी त्याला आपण सहकार्य करू आणि त्याच्यासह काम करीत राहू, असेही राहुल गांधी यांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची होती. याशिवाय सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मीरा कुमार, पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावे पुढे आली होती. मात्र, सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्याकडेच पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी दिल्याचे समजते.   Print


News - World | Posted : 2019-06-30


Related Photos