नागपूर - भामरागड बस नियमित सुरू करण्याची मागणी


- तहसीलदारांचे इमामवाडा आगाराला पत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
नागपूर - भामरागड ही बस अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काही बस चालक - वाहक बस अहेरी डेपोमध्येच थांबवून भामरागड येथे बस नेत नसल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. नुकताच हा प्रकार उघडकीस आला असून नागपूर - भामरागड बस भामरागडपर्यंत नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केल्यानंतर भामरागडच्या तहसीलदारांनी इमामवाडा आगाराच्या प्रमुखांना पत्र देवून बस नियमित करण्याची मागणी केली आहे.
२८ जून रोजी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आलापल्ली बसस्थानकावर २० प्रवासी भामरागड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. आलापल्ली बसस्थानकावर भामरागड - नागपूर ही शेवटची बस ६.३०  वाजता आली. परंतु बसचा फलक काढण्यात आला होता. सदर बसवर इमामवाडा लिहिलेले होते. यामुळे प्रवाशांनी विचारणा केली. बसमध्ये भामरागड येथे जाणारे प्रवासी बसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वाहकाने बसमध्ये बसण्यास मनाई केली. यानंतर काही वेळाने तपासणी पथक आलापल्ली येथील बसस्थानकावर आले. यावेळी सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पथकाने चौकशी करण्याचे कारण देत बस अहेरी आगारात घेवून गेली. याबाबत भामरागड चे तहसीलदार कैलास अंडील यांना माहिती दिली. तहसीलदारांनी आगारात चौकशी केली असता बस कोणतेही कारण नसताना डेपोमध्ये नेल्याचे निदर्शनास आले. बस भामरागड पर्यंत नेण्यात कोणतीही अडचण  नसताना चालक - वाहक मनमर्जीने बस भामरागड ला नेत नाहीत. यामुळे प्रवाशांना फटका बसतो. २८ जून रोजी प्रवाशांना आलापल्ली येथेच मुक्काम करावा लागला. तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करावी व यापुढे बस नियमित भामरागडपर्यंत पोहचविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-30


Related Photos