आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला सोबत घ्या : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी आतापासूनच कामाला लागा. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला सोबत घ्या अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यावर याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक शनिवारी दिल्लीत झाली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांशी जूळवून घ्या, लोकसभेत झालेल्या चुका टाळा, असे खडेबोल सुनावले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणीकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करताना राहुल गांधी यांनी राज्यातील नेतेमंडळी केवळ आपल्यापुरते आणि आपल्या नातेवाईकांपुरतेच काम केले, त्याचा फटका निवडणुकीत बसला. ही घराणेशाही थांबवा नाही तर घरी बसा, असा इशाराच त्यांनी दिला.  केवळ आपला व कुटुंबाच्या हिताचाच विचार न करता सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी द्या, असे त्यांनी सांगितले. 
काँग्रेसच्या काही नेत्यांनी एकवेळ वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करावी, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको अशी भूमिका घेतली. त्यावर राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी पक्ष धोकेबाज असला तरी धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी आवश्यक आहे. जास्तीत जास्त धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेससोबत कसे येतील या दृष्टीने प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.  Print


News - World | Posted : 2019-06-30


Related Photos